INTERVIEW – कॅटरिंग व्यवसाय करण्याकरिता परफेक्ट टिप्स देणारे शेफ चेतक

होम शेफ घडविणारा मास्टरशेफ कोरोनाने अनेकांना बेरोजगार केले तसेच अनेकांना उद्योग-व्यवसाय करायला सुद्धा शिकवले. फिक्की या उद्योजकीय संस्थेने २०२० मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार अंदाजे ७० टक्के स्टार्टअप्सना कोरोनाचा फटका बसला. अनेकांनी आपले ऑफिसेस, दुकाने बंद केले. काही उद्योजकांनी डिजीटल मंचाचा वापर केला. शिक्षणाचे डिजीटायझेशन झाल्यामुळे या क्षेत्रातला व्यवसाय दुप्पटीने वाढला. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या, सेवा देणाऱ्या कंपन्या चांगला व्यवसाय करु लागल्या. हे सारं कोरोनामुळे आलेलं डिजीटायझेशन ते शेफ पाहत होते. स्टार प्लस वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परिक्षक मंडळातील ते एक परिक्षक. आपण सुद्धा या बदलणाऱ्या काळासोबत बदलायला हवे असा विचार करत त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो फूड उद्योजक घडवले. ही यशोगाथा आहे शेफ चेतक ऍकॅडमीचे संचालक चेतक घेगडमल यांची. संतोष घेगडमल हे व्यवसायाने वकील. नाशिकचं सिन्नर हे त्यांचं मूळ. संतोष आणि ताईबाई या दाम्पत्यास एकूण ५ अपत्ये. ४ मुले आणि एक मुलगी. त्यातील चेतक हा लहानपणापासून हुशार. जरासा कल्पक वृत्तीचा. चेंबूरच्या महानगरपालिकेच्या शाळेत शालेय शिक्षण झालं. पुढे चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायचं त्याने ठरवलं. त्यासाठी परिक्षा दिली. ऑल इंडिया रॅंकिंग मिळालं आणि अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश निश्चित झाला. तीन वर्षे अथक परिश्रम घेऊन चेतकने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन केली. पदवी मिळविल्यानंतर सेंटॉर हॉटॆल मध्ये किचन सुपरवायझर पदावर नियुक्ती झाली. त्याचसोबत सहारा स्टार, सिरेना क्लब सारख्या नामांकित ठिकाणी नोकरी केली. दरम्यान नोकरी करता करता चेतकने वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दक्षिण भारतातील मदुराई विद्यापिठाची हॉटॆल मॅनेजमेंट विषयातील मास्टर्स पदवी मिळवली. १९९४ ते २००६ एवढा कालावधी सेंटॉर हॉटेलमध्ये नोकरी केल्यावर एक वेगळी संधी चेतकसमोर आली ती संधी होती अध्यापनाची. भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे मिळावेत यासाठी भारती विद्यापिठाने चेतक घेगडमल यांची नियुक्ती केली. शेफ चेतक ते प्राध्यापक चेतक असा नवीन प्रवास सुरु झाला. २००६ ते २०११ पर्यंत हा प्रवास असाच सुरु होता. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय असावा या ऊर्मीतून त्यांनी ’ला’बेला’ केटरिंग सर्व्हिसेसची स्थापना केली. लग्न समारंभ असो कि कोणताही आनंदी सोहळा या समारंभात येणाऱ्या पाहुण्यांची भोजनतृप्ती ला’बेला केटरिंग सर्व्हिसेस पूर्ण करत होती. अशा शेकडो विवाह सोहळ्यास भोजनाची सेवा पुरवली होती. सोबतच काही कंपन्यांचे कॅन्टीन चालवण्य़ाचे काम सुद्धा ला’बेला करत होती. पवईमध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ला’बेलाचे सेंट्रल किचन होते. ददरोज ३०० कर्मचाऱ्यांचे भोजन येथे तयार होत असे. मात्र यातील काही कंपन्या दुसरीकडे गेल्याने चेतक यांनी घरातूनच काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान कोणाला हॉटेल सुरु करायचे असेल तर त्यासंदर्भातील सल्लागार म्हणून देखील काम करण्य़ास त्यांनी सुरु केले. तसेच काही टु स्टार, थ्री स्टार तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्सना कर्मचाऱ्यांची सतत गरज लागते. अशा उमेदवारांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती करण्य़ाचे काम सुद्धा शेफ चेतक करु लागले. सोबतच विविध महाविद्यालयातून अध्यापनाचे काम सुरुच राहिले. भारत पेट्रोलियम सारख्या सरकारी संस्था आणि काही मोठ्या क्रूझना केटरिंगच्या सेवा ला’बेला ने पुरविलेल्या आहेत. दरम्यान १९९७ साली हॉटेल व्यवस्थापनाचे धडे घेतलेल्या वैशाली या सुविद्य तरुणीसोबत शेफ चेतक यांचा विवाह झाला. वैशाली घेगडमल या आता ग.द. आंबेकर महाविद्यालयातील हॉटेल व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आहेत. २०१९ च्या शेवटच्या महिन्यापासून कोविड-१९ ने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली. भारतात याचं गांभीर्य कळण्य़ासाठी मार्च २०२० चा महिना उजाडला. मार्च अखेरीस सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आणि अवघा देश शांत झाला. जाण्या-येण्य़ावर संपूर्ण निर्बंध आले. वर्क फ्रॉम होम संकल्पना रुढ झाली. डिजीटल माध्यमांकडे सगळे वळले. ऑफिसच्या मिटींग्ज असोत कि विद्यार्थ्यांचे लेक्चर्स सगळं ऑनलाईन सुरु झालं. नेमकं हाच धागा पकडून चेतक घेगडमल हे सुद्धा डिजीटल माध्यमाचा वापर करण्यास सज्ज झाले. विविध ऑनलाईन कोर्सेस कसे चालतात याचा बारकाईने अभ्यास केला. वेबिनार, ऑनलाईन लेक्चर्स, प्रेझेंटेशन कसे द्यायचे हे समजून घेतलं. शिकून घेतलं. त्यानंतर शेफ चेतक ऍकॅडच्या माध्यमातून शिकविण्य़ास सुरुवात केली. अगदी कांदा चिरण्य़ापासून ते चविष्ट बिर्याणी बनविण्य़ापर्यंत. स्वत:चा फूड स्टॉल टाकण्य़ापासून ते ऑनलाईन विक्री कशी करावी इथपर्यंत सर्व विषयांचे ज्ञान ते देऊ लागले. राष्ट्रीय़ कौशल्य विकास महामंडळाने शेफ चेतक ऍकॅडमी सोबत सहकार्य करत अनेक नव उद्यमींना घडविण्यास सुरुवात केली. याकामी युवा परिवर्तन या संस्थेची मोठी मदत झाली. शेफ चेतक ऍकॅडमीने ६०० पेक्षा अधिक लोकांना होम शेफ्स म्हणून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतांशजणांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले. डोंबिवली, पुणे, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी त्यांनी स्वत:चे फूड बिझनेस सुरु केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यावर्षी अन्नपदार्थ तयार करण्य़ाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे सर्वच महत्वाची बक्षिसे शेफ घेगडमल यांच्या विद्यार्थ्यांनी पटकावली. हेल्दी फूड्स पॅकेटची निर्मिती, स्नॅक्स आणि टेक अवे, टिफिन बिझनेस, होम बेकर गाईड असे विविध पर्याय या ऍकॅडमीत शिकवले जातात. प्रत्येकालाच स्वत:चं हॉटेल वा फूड स्टॉल सुरु करणं आर्थिकदृष्ट्य़ा शक्य नसतं. अशा लोकांसाठी मोबाईल फूड व्हॅन ही संकल्पना चेतक ऍकॅडमी राबविते. त्यासंदर्भातील शासकीय परवान्यासंदर्भातील मार्गदर्शन देखील ते करतात. यावर्षी दिवाळीचा फराळ त्यांनी परदेशात पाठविला होता. ”भारतीयांनी डॉलर मध्ये कमावले पाहिजे अशी माझी इच्छा आहे, त्यातूनच आम्ही परदेशात फराळ पाठविण्य़ास सुरुवात केली. ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला”, असे शेफ घेगडमल म्हणाले. शेफ चेतक घेगडमल हे स्टार प्लस वाहिनीवरील प्रसिद्ध अशा ‘मास्टर शेफ’ कार्यक्रमाच्या परिक्षक मंडळावर आहेत. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथील सहभागी स्पर्धकांच्या चाचण्या घेऊन त्यातील स्पर्धक निवडण्य़ाचं काम ते करतात. प्रत्येक माणूस हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधी न कधी त्याच्या मनात येतंच की आपला देखील हॉटेल व्यवसाय असावा. त्या प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्य़ासाठी शेफ चेतक घेगडमल सज्ज आहेत. खऱ्या अर्थाने ते होम शेफ घडविणारे मास्टरशेफ आहेत. प्रमोद सावंत- ८१०८१०५२३२ * सौजन्य : दै. मुंबई तरुण